| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
सर्वसामान्य मतदार हा गावात राहात आहे. प्रत्येकाला प्रमुख नेत्याशी भेटता येईलच असे नाही. यासाठीच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी लोकांच्या संपर्कात राहून तेथील होत नसलेली अथवा प्रलंबित कामाबाबत प्रमुख नेत्यांशी संवाद साधा, जेणेकरून ग्रामीण भागातील कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. गावातील विकासकामे झाली तरच लोक आपल्यासोबत राहणार आहेत. यासाठी लोकांच्या संपर्कात राहून तेथील विकासकामाला महत्त्व द्या, असे आवाहन शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांनी केले आहे. पंडित यांनी मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची भेट घेऊन संवाद साधला. यासाठी त्यांनी काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील डाकेली या गावाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, सहचिटणीस सी.एम. ठाकूर, अजित कासार, मधुकर पाटील, शरद चवरकर, रमेश दिवेकर, विजय म्हात्रे, बोर्ली सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासह डाकेली ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पाटील पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी नाराजी झटकून कामाला लागावे. मुरुड तालुक्यात सर्वाधिक विकासकामे करणारा हा शेतकरी कामगार पक्षच आहे. यावेळी पाटील यांनी समाजमंदिराची पाहणी केली. दिवाळीपूर्वी डाकेली गावातील रस्त्याचे काम पूर्ण करणार आहे, तसेच गावातील पाणी योजनासुद्धा मंजूर करण्याचे अभिवचन यावेळी पाटील यांनी दिले. तालुका चिटणीस मनोज भगत यांनीसुद्धा ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.