सुरक्षा यंत्र धुळ खात पडून, शिक्षण विभाग उदासीन
| अलिबाग | प्रमोद जाधव |
राज्यात आगी लागण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामुळे अग्नी सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. मात्र याबाबत शिक्षण विभाग उदासीन असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये असलेले अग्नी सुरक्षा यंत्र धुळ खात पडून आहे. त्याची मुदत संपूनही रिफीलींग करण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची अग्नी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्हयातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 2011 च्या जनगणेनुसार 16 लाख 64 हजार इतकी असून जिल्हयात सुमारे दोन हजार गावे, वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोन हजार 566 शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. परंतू जिल्हा परिषद शाळांची काही अवस्था बिकट आहेत. त्यात काही शाळांच्या भिंताना तडे पडले आहेत. त्यात काही खिडक्या खराब झाल्या आहेत. तर काहींचे पत्र जीर्ण झाले आहेत. काही शाळांमध्ये पावसाळ्यात गळती लागण्याचा प्रकारही घडत आहे. या तक्रारी होत असताना जिल्हा परिषद शाळांमध्ये अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये अग्नी सुरक्षा यंत्र बसविण्यात आले आहे. मात्र जिल्हा परिषद कार्यालयाबरोबरच जिल्हा परिषद शाळादेखील अग्नी सुरक्षेच्या बाबतीत उदासीन असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषद कार्यालयाची अग्नी सुरक्षा ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात फुटबॉल पध्दतीने अद्ययावत असे अग्नी सुरक्षा यंत्र बसवले होते. मात्र त्याची मुदत संपुनही ते बदलण्यात आले नाही, असाच प्रकार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येदेखील घडत असल्याचे चित्र पहावयवास मिळत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेले अग्नी सुरक्षा यंत्र कोपऱ्यात पडून असून ते धुळ खात आहे. त्यात या अग्नी सुरक्षा यंत्राची मुदत संपूनही शाळांकडून रिफीलींग करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक याबाबत निष्काळजीपणाने का वागत आहे, असा सवाल नागरिकांकडन उपस्थित केला जात आहे. रिफीलींग करण्यासाठी फक्त 700 ते800 रुपये खर्च केला जातो. मात्र त्यासाठीदेखील पैसे काढण्यास जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासन उदासीन ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरवर्षी अग्नी यंत्राची शाळेमार्फत रिफीलींग केली जाते. यंदा मात्र करण्यात आली नाही.
राजेंद्र म्हात्रे – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा रायगड