| रसायनी | वार्ताहर |
मोहपाडा येथील कैरे गावाजवळ असलेल्या जगदिश प्रा.लिमीटेड कंपनी राजकुमार शर्मा वेअरहाऊस हे लाकडी व प्लास्टीक पॅलेट बनविण्याचे गोदामाला आग लागून ते खाक झाले.
या गोदामात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पाताळगंगा व इतर कंपन्यांचे पॅलेट बनविले जात होते. आग विझवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे तीन अग्निशमन दल, पाताळगंगा एमआयडीसी एक, टाटा कंपनीचा एक, खोपोली नगरपालिका एक, पेण नगरपालिका एक, पनवेल महानगर पालिका एक, तळोजा एमआयडीसी एक अशा नऊ अग्निशमन दलानी जवळपास एकूण 70 ते 75 फे-या मारुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अखेर नऊ तासानंतर शनिवारी पहाटे तीन वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.
यावेळी घटनास्थळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बाळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा तैनात होती. तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार मंडळ अधिकारी खेडकर, वीज वितरणचे उपअभियंता गलांडे तसेच परिसरातील मान्यवर, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी हजर होते. दरम्यान या गोदामातील कामगार दिवसपाळी करुन घरी गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोदामातील माल आगीत खाक झाला आहे. नेमकी आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले याचा अंदाज अद्यापपर्यंत समजला नाही.