राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा टोला
| अलिबाग | प्रतिनिधी |
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे सरकार राज्यात निर्माण व्हावे हा निर्णय दिल्लीवरून झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीबद्दल जे भरत गोगावले यांनी विधान केले आहे, तसे जाणीवपूर्वक करू नये. भरत गोगावले हे शिवसेनेचे मालक नाहीत, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात शिंदे गट व अजित पवार गटातील अंतर्गत वाद आता उघडपणे दिसू लागला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे सरकार व्यवस्थित चालत होते. मात्र, काही राजकीय घडामोडींची गणिते जुळवून राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे.
राष्ट्रवादीला सोबत घ्यायला नको होते, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. महायुतीत आलबेल नसून, सर्व व्यवस्थित चालले आहे, असा कांगावा करणाऱ्या महायुतीतील अंतर्गत बिघाड स्पष्ट दिसू लागला आहे. दरम्यान, आ. मिटकरी म्हणाले, गोगावले यांनी रायगड लोकसभेच्या किंवा महाराष्ट्राच्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया दिली हे पाहावे लागणार आहे. कार्यकर्त्यांची समजूत करण्यासाठी असे विधान केले, की मनापासून ही प्रतिक्रिया दिली हेदेखील समजून घेतले पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे, हा निर्णय दिल्लीवरून अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे भरत गोगावले हे शिवसेनेचे मालक नाहीत. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी घेतलेला आहे. शिवसेनेला जशी अडचण वाटत होती, त्यानुसार यांना सोबत घेणेदेखील अडचणीचे असल्याचे त्यावेळी बोललो होतो, अशा प्रकारचे विधान जाणीवपूर्वक करणे गोगावले यांनी टाळावे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.







