गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

महायूतीमधील पक्षांमध्ये अंतर्गत चर्चेला उधाण

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मिळाला. काही दिवसांनी पालकमंत्री पदाचा मान मिळेल, असा विश्वास रोजगार मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त करीत अडचणीचा भाग आता राहिला नाही, असा टोला लगावला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्रकारांसोबत संवाद साधताना गोगावले म्हणाले. मात्र, गोगावलेंच्या या टोल्याने महायूतीमधील पक्षांमध्ये अंतर्गत चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात वाद पेटला होता. शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजीही व्यक्त केली होती. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला पालकमंत्री पद मिळावे, यासाठी महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरुच होती. मात्र, सरकारने रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा प्रश्न प्रलंबितच ठेवला आहे. तरीही गोगावलेंना पालकमंत्री पद मिळण्याची आशा कायमच आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाबरोबरच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान रोजगार मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते शनिवारी (दि.15) अलिबाग येथील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना गोगावले म्हणाले की, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मिळाला. काही दिवसांनी पालकमंत्री पदाचा मान मिळेल, अशी शाश्वती आहे. आता अडचण, अडथळा राहिला नाही. अडचणीचा भागच राहिला नाही, असे गोगावले म्हणाले. गोगावलेंच्या या वक्तव्याने महायुतीमधील घटक पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी अडथळा नक्की कोणाचा होता, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version