| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देऊन आता महिना होत आला आहे. मात्र, अद्यापही कोणाचीच वर्णी लागलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गटाने यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. याबाबत अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, म्हणजेच ‘देवाभाऊ’ घेणार आहेत. ‘देवाभाऊ मलाच पावू दे आणि पालकमंत्री मीच होऊ दे’ असे साकडे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट आई तुळजा भवानीला घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे आई तुळजा भवानी कोणाला पावणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मंत्री भरत गोगावले हे दोन दिवसांपूर्वी लातूरच्या दौर्यावर गेले होते. तेथून परत येताना गोगावले यांनी शुक्रवारी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेतले. याआधीदेखील भरत गोगावले यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी काहीच दिवसांपूर्वी अष्टविनायकांचे दर्शन घेतले होते.
दोन्ही बाजूकडून पालकमंत्रीपद अत्यंत प्रतिष्ठेचे केले आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. विशेष म्हणजे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्रीपद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली नाही. त्यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. बहुतांश जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पार पडून तेथील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील मंत्र्यांची आपल्या दालनात बैठक बोलावली होती. त्यावेळी जिल्ह्यातील नियोजन समितीच्या खर्चासह विकासकामांचा आढावा घेतला होता. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांना आमंत्रित न केल्याने शिंदे गटाच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावले त्यावेळी रायगड किल्ल्यावरील एका कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते.
अजित पवार यांनी बोलावलेली बैठक पूर्वनियोजित होती की भरत गोगावले यांचा रायगड दौरा अचानक होता. याबाबत अद्यापही संभ्रम असल्याचे दिसून येते. यातील कोणतीही एक शक्यता गृहीत धरली तरी, जिल्ह्याच्या विकासाची बैठक शेवटी आदिती तटकरे यांच्याच उपस्थित उरकावी लागली. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांचा चांगलाच तिळपापड झाला होता.
जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने ‘झुकेगा नही साला…’ याप्रमाणे विषय खूपच ताणून धरला आहे. यावर तोडगा म्हणून सहपालकमंत्रीपद निर्माण करण्याची तयारी महायुती सरकारने केली होती. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचीच ढवळाढवळ नको, अशी धारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची असावी. याच कारणाने तो विषय मागे पडला.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. आमच्या हातून चांगली कामं घडो. गोरगरीब, शेतकरी, कष्टकर्यांना आणि राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवावे, असे साकडं आम्ही देवीला घातलं आहे. मागील महायुती सरकारमध्ये मी मंत्री नव्हतो, त्यामुळे मला पालकमंत्रीपद देण्याचा काही प्रश्न नव्हता. आमचे मंत्री उदय सामंत यांना पालकमंत्रीपदावर संधी दिली होती. आता मी राज्य सरकारमध्ये मंत्री आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद मला मिळावे, अशी आमची मागणी आहे.
– मंत्री भरत गोगावले, शिंदे गट