। माथेरान । वार्ताहर ।
गावाचे काहीही होवो, मात्र आम्हाला मलिदा खाण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात जाऊद्या, अशी कुटील भावना येथील काही राजकीय मंडळींची आहे. त्यामुळे ही राजकीय मंडळी गावाला विकासाच्या प्रवाहात नेण्याऐवजी अधोगतीकडे नेण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यांच्यामुळे या दुर्गम भागात शासन विकासाची कवाडे खुली करत असताना होणार्या विकास कामांना किंवा जे काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता दृष्टीक्षेपात असून त्याला खीळ बसत आहे.
माथेरानचा भूभाग बिनशेतीचा असल्यामुळे स्थानिकांना पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून राहावे लागते. पर्यटकांमुळे या ठिकाणी व्यवसायाच्या रोजगाराचे साधन उपलब्ध होत असते. परंतु, जोपर्यंत माथेरानमध्ये विकासाच्या पाऊलखुणा उमटणार नाहीत तोपर्यंत माथेरान हे सुंदर स्थळ बनने आणि येथील सर्वसामान्य जनतेला आपला आर्थिक दृष्टीने विकास करणे अत्यंत कठीण आहे. दरम्यान, काही महत्वाकांक्षी राजकीय मंडळींना केवळ नगरपरिषदेत सत्ता मिळावी किंवा विविध क्षेत्रात पदे मिळावीत यासाठी दुय्यम भूमिका बजावित आहेत. अशा काही राजकीय मंडळींनी मागील काळात मूठभर मतांसाठी गावाला वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अशाच मतांमुळे कार्यक्षम व्यक्ती निवडला जात नाहीत. त्यामुळे विकासाला खीळ बसली असल्याची चर्चा सध्या माथेरानमध्ये होत आहे.