सरकारविरोधात कोल्हापुरात जनसागर रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
कोल्हापुरच्या गोकुळ दूध संघात शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावरुन राजकारण चांगलेच तापले असून, या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारविरोधात सोमवारी (दि. 9) जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत उपस्थितांनी सताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. गोकुळच्या कारभारात हस्तक्षेप करून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणली जात असल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. या संघर्ष मोर्चामुळे कोल्हापुरातील राजकारण टोकाला पोहोचले असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना गोकुळच्या निमित्ताने ऐन सणासुदीत पेटला आहे.
या मोर्चात खासदार शाहू छत्रपती, माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील, मालोजीराजे, ऋतुराज पाटील, राजीव आवळे आणि विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या होणार निवडणूक
राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक मंगळवारी (दि. 10) होणार आहे. यामध्ये निवडून आलेल्या 25 सदस्यांसोबतच शासनाने नियुक्त केलेले चार संचालकही मतदान करणार आहेत. मात्र या चार संचालकांची मतं बाजूला ठेवली जाणार आहेत. याबाबतचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्य सरकारने काढलेला अध्यादेश चुकीचा की बरोबर हे अद्याप ठरलं नाही. याबाबत 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
