एबीलिंपिक्स स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने रचला इतिहास

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड़ जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या 10 व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. चाळीस वर्षात पहिल्यांदा भारताला हे सुवर्णपदक मिळाले आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर यांनी शारीरिकदृष्ट्या असलेल्या आवाहनांना जिद्दी व चिकाटीने पेलत चित्रकलेच्या दुनियेत; याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून आमुलाग्र कामगिरी केली आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच 10 व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत चेतनने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्णपदक पटकावले. यामुळे चेतन याने महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुधागड तालुक्यासह भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


चेतनचा थक्क करणारा प्रवास
जन्मापासून श्रवण दोष असल्यामुळे त्याचे शिक्षण शारीरिकदृष्ट्या आव्हान असलेल्या शाळेमध्ये पूर्ण झाले आहे. तेथे शिक्षकांच्या संपर्कात असताना स्वतःचे भावचित्र कलेतून व्यक्त करण्याच्या मार्गावर नेण्यात आले. त्यानंतर चित्रकला हे चेतनच्या भावनेचे माध्यम बनले आणि सभोवतालच्या लोकांकडून चांगली दाद आणि प्रेरणा मिळाली. त्यानंतर एसएससी आणि जीडी आर्ट डिप्लोमा, बी.एफ.ए. पेंटिंग कला शाखा पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे शिक्षण चालू ठेवत एमएफए चित्रकला पदवी प्रथम श्रेणीने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. शिकत असतानाच त्याला 105 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये 10 सुवर्णपदके, 26 इतर पदके, 30 चषक आणि 115 हून अधिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. 2018 मध्ये राष्ट्रीय एबीलिंपिक्स दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये चेतन यांनी भारत देशाकडून सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. त्याच्या काही पेंटिंग्स भारतीय सैन्य दलातील एनएसजी कमांडोज यांना समर्पित केल्या आहेत.

Exit mobile version