स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

| नागोठणे | प्रतिनिधी |

नेपाळमधील बुढानीलकंठ येथे थर्ड वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 30 व 31 जुलै रोजी पार पडली. यामध्ये भारत आणि नेपाळसह 11 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत रोहा येथील स्वरांगी मोरे हिने सुवर्णपदक पटकावून रोहा शहरासह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

स्वरांगी मोरे ही रोहा येथील वकील भाग्यश्री मोरे यांची मुलगी आहे. नेपाळ मिक्स बॉक्सिंग असोसिएशन यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. नेपाळमधील बुढानीलकंठ, काठमांडू मधील मितेरी स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या या वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत, नेपाळ, बांगलादेश, अझरबैझान, श्रीलंका यांसह एकूण 11 देश सहभागी झाले होते. यापूर्वी आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या सागर धनाजी शेलार याने नेपाळमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि भारतीय संघाने एकूण 63 पदके मिळवली होती.

स्वरांगी मोरे हिला नेपाळ येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. थर्ड वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप या जागतिक
स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या स्वरांगीला तिचे मार्गदर्शक आणि सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वरांगी मोरे थर्ड वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविल्याने स्वरांगीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version