गोल्डन मोटर्स प्रकरण! दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आ. महेश बालदींचा समर्थक महेश कडूवर अटकेचे संकट

। पनवेल । प्रतिनिधी ।
367 ग्राहकांना फूस लावून जवळपास 30 कोटी रूपयांना गंडा घातलेले गोल्डन शोरूम्सचे मालक विक्रम तिलोरे, संतोष वेंगुर्लेकर यांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर तिसरा आरोपी महेश कडू असून त्यालाही लवकरच अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महेश कडू हा उरणचे आ.महेश बालदी यांचा खास कार्यकर्ता असून गुन्ह्यातील तिलोरे, वेंगुर्लेकर यांच्यासोबतीचा म्होरक्या असल्याचे तक्रारीत स्पष्ट झाले आहे. तसे अनेक पुरावे ग्राहकांनी केलेल्या तक्रारीतून पोलिसांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार गोल्डन शोरूम्सचे मालक विक्रम तिलोरे, संतोष वेंगुर्लेकर आणि महेश कडू या तिघांनी वाहन खरेदी करणार्या ग्राहकांना अनेक ऑफर देवून फूस लावली. त्यांच्याकडून वाहन खरेदीसाठी पैसे आणि कर्जाची रक्कमही उकळली. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, फॉरच्युनर ते लहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात बुकिंग करून काही वाहनांच्या कर्जाची रक्कमही त्यांनी लाटली. मुख्य वाहन वितरक नसलेल्या गोल्डन शोरूम्सने ग्राहकांच्या पसंतीची वाहने बुकिंग न करता, त्या रक्कमेचा अपहार करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता.

गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत विक्रम तिलोरे आणि संतोष वेंगुर्लेकर कल्याण, डोंबिवली, कर्जतकडे पळत सुटले होते. त्यांनी एका मित्राची गाडी चार दिवसांसाठी चार महिन्यांपूर्वीच घेतली होती. ती परत करत नव्हते. काल रात्री, नेरळजवळील कळंब गावात ती गाडी मूळ मालकाला दिसताच त्यांनी पोलिस ठाण्यात वर्दी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजा तेंडूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चिमटे यांनी त्या दोघांना एका घरातून ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले.

Exit mobile version