तहसीलदार रोहन शिंदेंचे युवकांना मार्गदर्शन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील युवकांना सुवर्ण संधी चालून आली आहे. कोतवाल भरती 2023 प्रक्रिया सुरू झाली असून, ही सुवर्णसंधी युवकांना शासनामार्फत मिळाली आहे. तरी या संधीचे सोने करा, असे मार्गदर्शन तहसीलदार रोहन शिंदे यांनी मुरुड तहसीलदार कार्यालयात कोतवाल भरती 2023रिक्त पदांच्या भरतीसाठी आरक्षण निश्चिती कार्यक्रमावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण, तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार राजश्री साळवी, विस्तार अधिकारी सुभाष वाणी, कृषी अधिकारी मनिषा भुजबळ आदींसह तालुक्यातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार शिंदे यांनी सांगितले की, तालुक्यातील वावडुंगी, मांडला,भोईघर, आगरदांडा, नांदगाव, मुरुड, उसरोली, वळके या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 30 टक्के महिला आरक्षण असणार आहे. तरी ही भरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार आहे. ही संधी तालुक्यातील युवक-युवतींनाच असणार आहे.