| पाली/गोमाशी | वृत्तसंस्था |
पुणे पिपरी चिंचवड येथे 19 ते 21 जुलै रोजी झालेल्या 21 व्या राज्यस्तरीय सिलंबम सिलेक्शन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुधागड तालुक्यातील मुळगाव नांदगाव येथील अदिती अभिजित मराठे हिने 17 वर्ष वयोगटातील 55 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
शिवकालीन युद्धकलेशी साधर्म्य असल्याने हा खेळ चर्चेचा ठरला आहे. एकूण पाच प्रकारांचा सिलंबममध्ये समावेश असून, चौदा, सतरा व एकोणीस वयोगटात खेळला जातो. सिलंबम हा मूळचा तामिळनाडूतील युद्धकला प्रकार आहे. त्याचा दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश झाला. सिलंबम खेळ चौदा वर्षाखालील गटात 120, सतरा वर्षाखालील गटात 100, तर एकोणीस वर्षाखालील गटात सुमारे 50 खेळाडू सहभागी होत आहेत.
असा खेळतात खेळ
लाठी लढत प्रकारात दहा बाय दहाच्या वर्तुळात दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे राहतात. लाठीच्या साह्याने ते एकमेकांच्या शरीराला स्पर्श करून गुण मिळवतात. वर्तुळाबाहेर गेल्यास स्पर्धकाचे गुण कमी होतात. लाठीचा जोरदार प्रहार होऊन शरीरास दुखापत होऊ नये, यासाठी हाताला हॅन्डग्लोज व डोक्याला हेल्मेट वापरले जाते. सिलंबममधील प्रकार एकेरी लाठी, दुहाती लाठी, तलवार फेक, भाला फेक, लाठी लढत.
