23 सुवर्णांसह एका रौप्यपदकाची कमाई
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागच्या खेळाडूंनी भारतासाठी नेपाळ येथील पहिल्या लाठी साऊथ एशियन गेम्स 2022 या स्पर्धेत 23 सुवर्ण, तर एक रौप्यपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंनी अक्षरशः पदकांची लयलूट करत अलिबागचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. या खेळाडूंच्या सुवर्ण कामगिरीचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे.
भारताला परंपरेने अनेक गोष्टी लाभल्या आहेत. आणि खेळ हा त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक युगातही हीच परंपरा जोपासत आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचे काम अनेकजण करीत असतात. त्यामध्येच नेपाळ येथील काठमांडूला पार पडलेल्या पहिल्या या स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंनी भारताचे नेतृत्व करताना 23 सुवर्णपदकांसह एक रौप्यपदक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली.
या स्पर्धेत आठ वर्षांखालील मुलांच्या गटात शिवम संदेश गुंजाळ एक सुवर्ण व एक रौप्यपदक, प्रियेश प्रचित मसाल दोन सुवर्णपदके पटकाविली. दहा वर्षांखालील मुले गटात अंश मनोज म्हात्रे एक सुवर्ण पदक, मल्हार संदेश गुंजाळ दोन सुवर्ण, देवदत्त मनिश पडवळ दोन सुवर्णपदके पटकाविली. 14 वर्षांखालील मुली गटात स्नेहा प्रचित मसाल दोन सुवर्णपदक, सृष्टी अभय म्हामूणकर एक सुवर्णपदक, नम्रता गणेश चव्हाण दोन सुवर्णपदके, साना सत्यजित तुळपुळे दोन सुवर्णपदके, लावण्या प्रवीण भगत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. 18 वर्षाखालील मुले गटात वेदांत संदेश सुर्वे दोन सुवर्णपदके पटकाविले. सिनिअर गटामध्ये शुभम महेंद्र नखाते दोन सुवर्णपदक मिळविले.
या सर्व खेळाडूंना गुरु प्रियंका संदेश गुंजाळ यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले असून, मार्गदशक म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.