विजय बजरंग व्यायाम शाळा दुसऱ्या फेरीत
| मुंबई | प्रतिनिधी |
गोलफदेवी सेवा, साऊथ कॅनरा स्पोर्टस्, विजय बजरंग व्यायाम शाळा, शिवशक्ती मंडळ यांनी विजय नवनाथ मंडळाने ”अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात ”लोकनेते स्व. दत्ताजी नलावडे सुवर्ण चषकाकरीता” सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वरळीगावच्या गोलफादेवीने लोअर परेलच्या श्री साई क्रीडा मंडळाचा प्रतिकार 40-31 असा मोडून काढला. सावध सुरुवात करीत विश्रांतीला 22-18 अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीने नंतर देखील संयमी खेळ करीत हा विजय मिळविला. धनंजय सरोज, अक्षय बिडू, तुषार दुढये गोलफादेवीकडून, तर अभिषेक चव्हाण, दिपेश तांबे श्री साई संघा कडून उत्कृष्ट खेळले.
साऊथ कॅनरा स्पोर्टस् ने नवोदित संघाला 47-28 असे नमवित आगेकूच केली. पहिल्या डावात लोण देत 26-09 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या साऊथ कॅनराला दुसऱ्या डावात मात्र नवोदितने कडवी झुंज देत विजयासाठी चांगलेच झुंजविले. सर्वदिप माने, किरण गर्जे साऊथ कॅनरा संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अथर्व सुवर्णा, गौरंग तावडे यांनी नवोदित कडून दुसऱ्या डावात शर्थीची लढत दिली. आकाश निकम, गणेश हातकर यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाने विजय बजरंग व्यायाम शाळेने डॉ. आंबेडकर स्पोर्टस् ला 35-21 असे पराभूत केले. डॉ. आंबेडकर कडून ऋतिक कांबळे, साई हेळगावकर यांनी उत्तम लढत दिली. शेवटच्या सामन्यात शिवशक्ती मंडळाने हिंद केसरी मंडळाचा 39-17 असे पराभूत केले. दीपक शिंदे, आदर्श गोडसे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. हिंद केसरीचा निलेश यादव चमकला.