खंडाळा घाटातील रखडपट्टी टळणार; मिसिंग लिंकचे काम पूर्णत्वाकडे
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्चून 13.5 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारला असून, साडेसहा किमीच्या द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे.
एमएसआरडीसीने 2018 मध्ये खोपोली ते कुसगाव दरम्यान मिसिंग लिंक आणि साडेसहा किलोमीटर लांबीच्या द्रुतगती मार्गाचे चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मिसिंग लिंकवरील 1.64 किमी आणि 8.92 किमीच्या लांबीच्या आणि 23.50 मीटर रुंद बोगद्यांचे आणि दरीवर 900 मीटर लांब आणि 180 मीटर उंचीच्या केबल-स्टेड ब्रिजचे काम पूर्ण केले आहे. कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. दरीत 184 मीटर उंचीचा आणि 26 मीटर रुंदी असलेला केबल-स्टेड ब्रिज उभारला असून, त्याचा पाया तब्बल 28 मीटर खोलीपर्यंत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसना प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.
पाच रिश्टर स्केलचा भूकंप पचवणार
लोणावळा भूकंपाच्या दृष्टीने फारसा संवेदनशील नसला तरी पाच रिश्टर स्केलचा भूकंप पचवू शकेल, अशी केबल-स्टेड ब्रिजची रचना केली आहे. पायलॉन म्हणजे उभ्या पिलरमध्ये 32 एमएमचे लोखंडी रोड वापरले आहेत. वायडक्टसाठी 3.5 लाख क्युबिक मीटर सिमेंट काँक्रीट, 31 हजार टन लोखंडाचा वापर केला आहे.
मिसिंग लिंकची गरज का?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग-4 खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात, तर खंडाळा एक्झिटजवळ वेगवेगळे होतात. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या सहा मार्गिका आणि महामार्ग चारवरील चार मार्गिकांची वाहतूक एकत्र येत असल्याने घाट परिसरात या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून एमएसआरडीसीकडून मिसिंग लिंकचा पर्याय पुढे आणला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार आहे.
असा आहे प्रकल्प
6,695.37 कोटी प्रकल्पाचा खर्च
13.5 किलोमीटर मिसिंग लिंकची लांबी
6 कि.मी.खोपोली एक्झिट ते कुसगाव मूळ अंतर कमी होणार
25-30 मिनिटे प्रवासाचा वेळ वाचणार







