प्रवाशांसाठी खुशखबर! एसटीचा प्रवास होणार कॅशलेस

रायगड जिल्ह्यासाठी दीड हजार मशीन उपलब्ध

| अलिबाग | प्रमोद जाधव |

तिकीट काढण्यासाठी आता पैसे देण्याऐवजी कॅशलेस व्यवहार करता येणार आहे. एसटी महामंडळ रायगड विभागात सुमारे दीड हजार अद्ययावत तिकीट मशीन उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अलिबाग व पेण आगारातील वाहकांकडें या नवीन मशीन देण्यात आल्या असून, या मशीनमार्फत तिकीट देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. क्युआर कोड अथवा एटीएममार्फत ऑनलाईन पद्धतीने तिकिटाचे पैसे देऊन तिकीट घेता येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रोखीत व्यवहारापेक्षा कॅशलेस व्यवहाराला जिल्ह्यामध्ये पसंती येऊ लागली आहे. एका क्लीकवर आर्थिक व्यवहार करण्याची पद्धत वाढू लागली आहे. कॅशलेसची वाढती मागणी ओळखून एसटी महामंडळदेखील याच पद्धतीने हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी तिकीट देण्यासाठी रोख रक्कम प्रवाशांकडून घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक वेळा सुट्टे पैशांवरून वाहक व प्रवाशांसोबत शाब्दीक वाद होत असल्याच्या घटना घडत आहे. हा प्रश्न आता लवकरच कायमचा सुटणार आहे. एसटी महामंडळामार्फत कॅशलेस व्यवहार केला जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाकडे तिकीट काढण्याची अद्ययावत मशीन दाखल झाली आहेत. ही मशीन स्क्रीन टच असून, दोन ते तीन दिवस बॅटरी चालणारी आहे. या मशीनमध्ये जीपीएस प्रणाली असून, एटीएम कार्ड व क्यु आर कोडचीदेखील व्यवस्था आहे. ही मशीन अपडेट होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. आगारांमध्ये नवीन संगणक बसविल्यावर ही प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार असल्याची माहिती अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी दिली.

मशीन घेण्याचा पहिला मान मला मिळाला, त्याबद्दल वरिष्ठांचे आभारी आहे. मशीन हाताळण्यास सोपी असून, कामही वेगात होत आहे. टच स्क्रीन मशीन असल्याने कामाचा वेगही वाढण्यास मदत होत आहे. ही मशीन अद्ययावत असून, बॅटरी बॅकअपही चांगला आहे.

शिल्पा सुळे, वाहक, अलिबाग आगार

विभाग कार्यालयालयाकडून तिकीट काढण्याच्या 140 नवीन मशीन देण्यात आल्या आहेत. या मशीन वापरण्यास सुरुवात केली आहे. नवीन मशीन अपडेट केल्यावर कॅशलेस प्रक्रिया राबविली जाणार आहे. रोकडऐवजी क्यूआर कोड अथवा एटीएम कार्डमार्फत आर्थिक व्यवहार होणार आहेत.

अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग

दीड हजार मशीन रायगड जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. अलिबाग व पेण येथे मशीनचा वापर पहिल्या टप्प्यात सुरु केला आहे. मशीन अपडेट करण्याचे काम सुरु असून, त्यासाठी लागणारे स्थानकातील संगणक आदी साहित्य पुरविण्याचे काम सुरु आहे.

दिपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड विभाग, एसटी महामंडळ
Exit mobile version