रसायनीत पेंढ्याला चांगला भाव

। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरात दुबार भातकापणीनंतर पेंढ्याला खूपच मागणी वाढली आहे. भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. दरम्यान, परिसरातील दुग्ध व्यवसाय करणार्‍यांना जास्त भावाने वैरण खरेदी करावी लागत असल्याने ते हताश झाले आहे. रसायनी परिसरातील वडगाव, वासांबे मोहोपाडा, आपटे, चावणे, पंचक्रोशीतील शेतकरी पावसाळी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. मात्र परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले होते. तर काहींचे पीक कुजून गेले. त्यात बाहेरगावच्या दुग्ध व्यवसाय करणार्‍यांकडून वैरणीला मागणी वाढत गेली. बाहेरगावचे व्यावसायिक गावागावांत फिरून वैरण विकत घेऊन गेले. त्यामुळे सुरुवातीला पाच-सहाशे रुपये कमी असलेले 800-हजार रुपयांवर चारा गेला आहे. दुबार पीक झोडपणीनंतर शेतकर्‍यांना शेकडा सुमारे 1300 रुपये भाव मिळत आहे, असे विक्रेत्या शेतकर्‍यांनी सांगितले. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

Exit mobile version