शिवभक्तांच्या संतापापुढे गुगल नमले

सरखेलांच्या नावासोबतचा आक्षेपार्ह उल्लेख हटविला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख गुगल सर्च इंजिन वर केला जात असल्याने शिवभक्तांमध्ये संताप पसरला होता. गुगल सर्च इंजिनवर जाऊन इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांनी याबाबत आक्षेप नोंदवण्याची मोहीम सुरु केली होती. यानंतर गुगलला जाग आली असून कान्होजी राजे यांच्या समोरील समुद्री चाचे असा उल्लेख हटविण्यात आला आहे.

मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांना ओळखले जाते. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज यांची अनेक आक्रमण त्यांनी परतावून लावली. भारतीय नौदलाकडून त्यांना मेंटोर म्हणून बघितले जाते. गेल्या दोन दिवसांपासून गुगलवर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्री चाचे असा करण्यात आल्याचं दिसून आले. यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

ही बाब लक्षात घेऊन शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमीं संघटनांनी यावर आक्षेप घेण्यासाठी मोहीम राबवली होती. दोन दिवसात हजारो आक्षेप गुगलकडे नोंदविण्यात आले होते. यानंतर गुगलने या संदर्भातील दुरुस्ती केली आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या समोरील पायरेट्स असा उल्लेख हटविण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

परदेशी इतिहासकारांकडून भारतातील योध्द्यांचे चुकीचे चित्र जगासमोर रंगविले जाते. त्यामुळे आपण सजग असणे आवश्यक आहे. दोन दिवसात इतिहासप्रेमी संघटनांनी यासंदर्भात गुगलकडे हजारो आक्षेप नोंदविले होते. समाजमाध्यमांवर यासंदर्भात जोरदार मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गुगलला त्याची दखल घेणे भाग पडले आहे.

रघुजीराजे आंग्रे
कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज
Exit mobile version