अलिबागच्या प्रेक्षकांवर ‘गूज’चे गारुड

स्थानिक कलावंतांची कसदार निर्मिती
। सायली पाटील । अलिबाग ।

अटल करंडकासह अनेक पुरस्कार मिळविलेल्या फ्रायडे फिल्म्स प्रोडक्शन निर्मित आणि किरण साष्टे दिग्दर्शित ‘गूज’ या एकांकिकेचा विशेष प्रयोग अलिबागकरांसाठी आयोजित करण्यात आला होता. त्यातील स्थानिक कलाकारांच्या कसदार अभिनयाबरोबरच नेपथ्य, संवाद, संगीत आदींमुळे ही एकांकिका उपस्थित प्रेक्षकांना भावली.

गूज या एकांकिकेमधून सारंग आणि अनन्या यांच्या अनोख्या प्रेमाची कहाणी मांडण्यात आलेली आहे. प्रेमाची एक वेगळीच परिभाषा लेखिका चैताली गानू यांनी त्यांच्या शब्दांतून गूज नावाच्या एकांकिकेतून मांडली असून किरण साष्टे आणि ज्योती राऊळ यांचा जबरदस्त अभिनय, राहुल सिद्धार्थ साळवे (शीर्षक गीत), तरंग साष्टे (शीर्षक संगीत/गायक), संदेश मयेकर (प्रकाश योजना), विक्रांत वार्डे (पार्श्‍वसंगीत), संकल्प केळकर (संगीत संयोजक), विवेक म्हात्रे (प्रकाश योजना सहाय्य), सायली हेंद्रे (नेपथ्य), हिमांशू काठे (नेपथ्य सहाय्य) यांच्या कलाकृती व मेहनतीतून साकारण्यात आला आहे. पीएनपी नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (20 मार्च) या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ज्योतिषतज्ञ अतुल भगरे गुरूजी हे नाशिक येथून आवर्जून उपस्थित होते.

गूज ही यावर्षीची अटल करंडक विजेती एकांकिका असून अनेक स्पर्धांमध्येही बक्षीसपात्र ठरलेल्या या एकांकिकेला राज्यभरातील रसिकांनी आधीच आपलंसं केलं होतं. परंतु अलिबागच्या कलाकारांनी साकारलेली ही एकांकिका पहिल्यांदाच प्रत्यक्षात अलिबागकरांसमोर सादर होत असताना सर्वच अलिबागकरांनी टाळ्यांच्या गजराने आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

प्रेमाने मंतरलेल्या या जगात जेव्हा सध्याच्या बोचणार्‍या वास्तविक प्रेमाची जाणीव होत तेव्हा कुठेतरी अविश्‍वासू असणारं, तितकसं भक्कम नसणारं, गैरसंवादामुळे वादविवादात गुरफटणारं असं प्रेम हल्ली पाहायला मिळतं. त्यामुळे प्रेम कसं असावं याची नेमकी व्याख्या कोणीच करू शकणार नाही. पण, गूज या एकांकिकेने प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेम म्हणजे कोणासाठी जीव देणं किंवा कोणाचा जीव घेणं नसून एकमेकांसाठी जगत असताना एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणं होय. अशीचा काहीशी आगळीवेगळी प्रेमकहाणी गूज या एकांकिकेतून मांडली आहे.

चित्रलेखा पाटील यांच्यामुळे स्वप्न साकारले
एखादी एकांकिका असो वा नाटक अथवा चित्रपट बनविण्यासाठी लोकाश्रयाबरोबर राजाश्रयाचीही तितकीच गरज असते. तो राजाश्रय आम्हाला चित्रलेखा पाटील यांनी नेहमीच दिला आहे. अलिबागच्या कलाकारांचीच असणारी गूज ही एकांकिका अलिबागकरांसाठी घेऊन येणं ही आमच्या सर्वांचीच इच्छा होती. त्यातच शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी आम्हाला पीएनपी नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याने हे स्वप्न साकार झाले आहे. कार्यक्रम कोणताही असो पण प्रत्येकवेळेस त्या कायमच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात, असे दिग्दर्शक किरण साष्टे यांनी आवर्जून नमूद केले.

गूज या एकांकिकेच्या लिखाणात प्रेमाबद्दल मी फार काही चौकार-षटकार मारलेले नाहीत. पण, सध्याच्या वास्तवात प्रेमाच्या फार चुकीच्या व्याख्या दिसून येतात. त्यामुळे, प्रेमाची थोडी वेगळी परिभाषा मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे.

चैताली गानू, लेखिका
Exit mobile version