| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मॅरेथॉनमधील माजी आशियाई विजेता गोपी थोनाकलने रविवारी अपेक्षितपणे दिल्ली मॅरेथॉन जिंकली. पण तो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेपासून मोठ्या फरकाने दूरच राहिला. गोपीने 2017 मध्ये आशियाई मॅरेथॉन जिंकली होती. त्यानंतर आता दिल्ली मॅरेथॉन जिंकताना गोपीने 2 तास 14 मिनिटे 40 सेकंद अशी वेळ दिली. मात्र, तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी निश्चित करण्यात आलेली 2 तास 8 मिनिट 10 सेकंद ही पात्रता वेळ गाठू शकला नाही.
गोपीने यापूर्वी 2017 मध्येदेखील ही शर्यत जिंकली होती. त्या वेळेस त्याने 2 तास 13 मिनिट 39 सेकंद ही आपली वयैक्तिक सर्वोत्तम वेळ दिली होती. या दोन्ही विजयात त्याची धाव राष्ट्रीय विक्रमाच्या तुलनेत संथच राहिली. त्यामुळे शिवनाथ सिंहचा 1978 मध्ये नोंदवलेला 2 तास 12 मिनिटाचा राष्ट्रीय विक्रम आबाधित राहिला. तीन वर्षांपूर्वी विजेतेपद मिळवणारा श्रीनु बुगाथा (2तास 14 मिनिट 41 सेकंद) दुसर्या, तर अक्षय सैनी (2 तास 15 मिनिट 27 सेकंद) तिसर्या स्थानावर राहिला.
शर्यतीच्या पूर्व संध्येलाच गोपीने पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा पात्रता निकष गाठणे भारतीय धावपटूच्या आवाक्यात नसल्याचे मत मांडले होते. ते शर्यतीनंतर खरे ठरले. महिला विभागात आश्विनी जाधवने 2 तास 52 मिनिट 25 सेकंद वेळ देताना विजेतेपद पटकावले. निरंबन भारतजी दुसरी, तर दिव्यांका चौधरी तिसरी आली.







