गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

| मुंबई | प्रतिनिधी |

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने 2453 दावे निकाली काढले असून, त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या 138 दिवसांच्या खंडित कालावधीतील 77 (73 मृत्यू व 4 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 1 कोटी 51 लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.

राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 239 दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील 239 (237 मृत्यू व 2 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 4 कोटी 76 लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील 2137 (2094 मृत्यू व 43 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 42 कोटी 36 लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची 47 कोटी 12 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 आणि 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 2453 दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Exit mobile version