| मुंबई | प्रतिनिधी।
महाराष्ट्रात पुढील 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने राज्यातील 24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला असून कोकणासह अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून, कोकण किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, ठाणे, नाशिक, रायगड, मुंबईसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी, नाले तसेच समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.






