गोरठण बुद्रुक,वावोशीला जोडणारा पूल कमकूवत

खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील गोरठण बुद्रुक,वावोशी या गावातील दोन साकव हे जीर्ण स्थितीत असल्याने जिल्हा परिषदेकडून सदर गावांना जोडणारे साकव बांधण्यासाठी सन 2019 रोजी रायगड जिल्हा परिषदेकडून 30 लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला.मात्र आजपर्यंत अनेकवेळा पत्रव्यवहार करून देखील सदर साकवांचे काम न झाल्याने ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करीत आहेत.
लहान मुले,कामगार,महिला, ग्रामस्थ या नादुरुस्त साकवावरून जीव मुठीत धरून भर पावसाळ्यात ये-जा करतात.पावसाचे प्रमाण वाढल्यावर तर जिविताला मोठा धोका निर्माण होतो तसेच अनेकजण शेती करीत असल्याने शेतीसाठी लागणारे साहित्य ने -आण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या साकवाबद्दल विविध बाबीतून पत्रव्यवहार करून देखील कठोर हृदयाच्या अधिकार्‍यांना पाझर फुटत नसल्याने लवकरच आंदोलन करण्याच्या पवित्र्यात ग्रामस्थ आहे. या साकवाच्या माध्यमातून जनतेची होणारी त्रेधातिरपीट थांबवावी व ग्रामस्थांच्या जीवाशी न खेळता त्वरित कामास सुरुवात करून पीडित ग्रामस्थांचे आशीर्वाद घ्यावेत अशी मागणी गोरठण ग्रामपंचायतीचे सरपंच विक्रांत पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version