| पाली | प्रतिनिधी |
थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, खवय्यांनी यंदा मासळीवर विशेष ताव मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ताजी मासळी उपलब्ध होत आहे. याचा थेट फायदा मासळी व्यवसायाला झाला असून विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्याला तब्बल 240 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे खाऱ्या पाण्यातील विविध प्रकारची ताजी मासळी सहज उपलब्ध होते. नाताळच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, फार्महाउस आणि कॉटेजेस पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. अनेक पर्यटक खास ताजी आणि चवदार मासळीचा आस्वाद घेण्यासाठी रायगडमध्ये दाखल होत असल्याचे दिसून आले. येथील मासळी मोठ्या प्रमाणावर मुंबई तसेच इतर शहरांमध्येही पाठवली जात आहे. कोळंबी, सुरमई, रावस, घोळ, टोळ, कर्ली, पापलेट यांसारख्या माशांना विशेष मागणी असून बागडा, बोंबील, मांदेली आणि बांगडा यांचीही ङ्गलॉटरीफ लागत असल्याचे मासळीविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. वाढलेल्या मागणीमुळे मासळीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत असून थर्टी फर्स्टसाठी अनेक ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केल्यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आगाऊ बुकिंगमुळे व्यवसाय तेजीत
नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षअखेरच्या सेलिब्रेशनमुळे मासळीला मोठी मागणी असून विक्री चांगली होत आहे. मासळी मुबलक आणि ताजी मिळत असल्याने खवय्ये खुश आहेत. थर्टी फर्स्टसाठी अनेकांनी आधीच आगाऊ बुकिंग केली आहे, अशी माहिती येथील मासळीविक्रेत्यांनी दिली.
मासळीचे अंदाजे दर (प्रति किलो)
बोंबील : 400 ते 600 रुपये.
पापलेट (मध्यम) : 1,000 ते 1,200 रुपये.
पापलेट (मोठे) : 1,200 ते 1,600 रुपये.
सुरमई, घोळ, रावस : 1,000 ते 1,200 रुपये.
मांदेली : 200 ते 300 रुपये.
मध्यम कोळंबी : 400 ते 600 रुपये.
बांगडा (मालवणी) : 400 ते 500 रुपये.
हलवा : 700 ते 800 रुपये.
टोळ : 500 ते 600 रुपये.
