खवय्यांचा मासळीवर ताव
| पाली/वाघोशी | वार्ताहर |
थर्टी फर्स्टनिमित्त जिल्ह्यात लाखो पर्यटक दाखल झाले असून, हॉटेल्स, लॉजिंग, कॉटेजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. रायगड जिल्ह्यात ताजी मासळी खाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मासळीचे भाव वधारले आहेत. तरीदेखील मासळी खरेदीसाठी मच्छी मार्केटमध्ये मोठी खवय्यांची झुंबड पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. येथे येणारे पर्यटक खार्या पाण्यातील माशांना पसंती देत आहेत. त्यामुळे मासळीचे भावदेखील वधारले असून, थर्टी फर्स्टसाठी अनेकांनी आगाऊ बुकिंग देखील केली आहे. जिल्ह्याला तब्बल 240 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे समुद्रातील ताजी मासळी सहज उपलब्ध होते. नाताळ सुट्टीत पर्यटकांची येथे मोठी गर्दी आहे. अनेक लोक व पर्यटक खास ताजी मासळी खाण्यासाठी येथे येतात. तर येथील मासळी मोठ्या प्रमाणात मुंबई व इतर शहरातदेखील जाते. कोळंबी, सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ व पापलेट आदी माशांना पसंती मिळत आहे. बागडा, बोंबील, मांदेली, बांगडा असा माशांची लॉटरी लागत आहे.
फार्म हाऊस व कॉटेजवर मागणी
रायगड जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात इतर फार्म हाऊस आहेत. नाताळच्या सुट्ट्यांमुळे हे फार्म हाऊस मालक मुंबई, पुणे आदी शहरातून आपल्या फार्महाऊसवर मित्रमंडळी किंवा कुटुंबासमवेत दाखल झाले आहेत. येथे अनेक कॉटेजेसदेखील आहेत आणि या ठिकाणीदेखील पर्यटक येऊन विसावले आहेत. या ठिकाणी मासळीला अधिक मागणी असून, नियमित मासळीवर ताव मारला जात आहे.
मासळी दर प्रतिकिलो
(ठिकाणानुसार यामध्ये कमी जास्त भाव आहे) बोंबील - 400 रुपये, पापलेट मध्यम - 1000 ते 1200, पापलेट मोठे - 1200 ते 1500, सुरमई - 1000, घोळ - 1000, रावस - 800 ते 1000, मांदेली - 200 ते 300, मध्यम कोळंबी - 400 ते 600, बांगडा मालवणी - 400, हलवा - 700, टोळ - 500 या शिवाय इतरही वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
नाताळ सुट्ट्यांमुळे सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी त्यांचा कल मासळी खाण्यावर अधिक आहे. मासळीदेखील मुबलक व ताजी भेटत आहे. त्यामुळे खवय्ये खुश आहेत. परिणामी, विक्रीसुद्धा चांगली होत आहे. थर्टी फर्स्टसाठी अनेकांनी आगाऊ बुकिंग केली आहे.
– गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या, पेण-पाली
नाताळ सुट्ट्यांमध्ये व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारी व इतरत्र फिरण्यासाठी सहकुटुंब लोक येत आहेत. बहुतांश जण मासळी खाण्याला पसंती देतात.
– मनीष पाटील, चालक, माऊ रेस्टॉरंट, दिवेआगर