थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची पोपटीला पसंती
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
थर्टी फर्स्टचे बेत सर्वत्र रंगू लागले आहेत. आणि या थर्टी फर्स्टला पोपटी पार्टीशिवाय रंगत नाही. शिवाय, पर्यटकांचा राबतादेखील रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे आणि या पर्यटकांनादेखील पोपटीची टेस्ट भारी आवडते. रायगड जिल्ह्यात पोपटी प्रसिद्ध आहे. सध्या येथे पोपटीचे वेगवेगळे ट्रेंडदेखील सुरू आहेत. आणि या अनोख्या प्रकारच्या पोपटीची मागणीदेखील खूप आहे. शाकाहारी व मांसाहारी पोपटीचा सर्वत्र घमघमाट सुटला आहे.
विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी व बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध आहे. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. यालाच पोपटी असे म्हणतात. काही ठिकाणी मडक्याऐवजी पत्र्याचा डब्बासुद्धा वापरला जातो. पोपटीत वालाच्या शेंगांबरोबर कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन, मसाळी व चिंबोर्या घालून लज्जत वाढवली जाते. वालाबरोबर मटारच्या शेंगादेखील टाकतात. ठिकठिकाणी शेतावर तसेच मोकळ्या जागेवर, फार्म हाऊस व घराबाहेर मोकळ्या जागेत आदी ठिकाणी या पोपटी पार्ट्यांची धूम पाहायला मिळते. काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात, तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाणघेवाणसुद्धा होते.
याशिवाय येथील काही हॉटेल व कॉटेज व्यावसायिकांनी आपल्या मेनूमध्ये पोपटीचा समावेश केला आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने पर्यटकदेखील पोपटीची मजा लुटतात. त्यामुळे व्यवसायदेखील चांगला होतो, असे सुधागड तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आश्रय काटकर यांनी सांगितले.
शेतात लावलेल्या पावट्याच्या शेंगा वापरून पोपटी बनवली आहे. कारण अजून गावठी वालाच्या शेंगा येण्यास अवकाश आहे. पोपटी पार्टीच्या निमित्ताने घरातील सर्व मंडळी एकत्र येतात. महिला, जेष्ठ व लहानमुले विशेष आनंद घेतात. पोपटीचा आस्वाद घेता घेता गप्पा गोष्टी रंगतात. या हंगामात दरवर्षी कुटुंबियांसोबत पोपटीचा बेत केला जातो.
– मयुरी रुपेश ठोंबरे, पाली
रायगड जिल्ह्यातील पोपटी हे विशेष खाद्य आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते उपलब्ध आहे. थर्टी फर्स्ट साठी खास पोपटीचा बेत आखला जात आहे. जिल्ह्या बाहेरून येणारे पर्यटकांना पोपटी खूप आवडते. रोजगाराला देखील चालना मिळते.
– उमेश तांबट, पर्यटन व्यावसायिक, सुधागड
निडीच्या गावठी शेंगांना पसंती
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा विशिष्ट गोड चव व टपोरे दाण्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. निडीगावच्या परिसरातील जमिनीचा पोत कसदार असून, परंपरागत पद्धतीने जपवूणक करुन ठेवलेले बियाण्याचाच वापर येथे केला जातो. हे बियाणे दुसरे कुठे नेऊन पिकविल्यास अशी दर्जेदार शेंग होत नाही. या वालाला विशिष्ट गोड चव, शेंगेचा आणि दाण्याचा आकारही मोठा. सुरुवातीस बांधावर आलेल्या शेंगाची चव तर अधिकच रुचकर असते. या शेंगांचा वाल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष
याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगड मध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसतांना देखिल याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चव देखिल येते हे याचे विषेश.
पोपटी बनविण्याची विशिष्ठ पद्धत
सर्व प्रथम मोठ्या मडक्यामध्ये तळाला भामरुडचा पाल्याचा थर लावावा. मग त्यावर टपोर्या वालाच्या शेंगाचा एक थर लावावा. त्यावर बटाटा व कांदे ठेवावेत, चिकन मांसाहारी असल्यास चिकन, मासळी व अंडी ठेवावे. यावर जाडे मिठ व ओवा गरजेप्रमाणे पसरवावा. पुन्हा अशाच प्रकारे वालाच्या शेंगाचा टाकुन इतर साहित्याचा थर लावावा. मडके भरल्यानंतर त्याला निट हालवावे जेणे करुन आतील सर्व जिन्नस घट्ट बसेल. त्यानंतर मडक्याचे तोंड भामरुडीच्या पाल्याने घट्ट बंद करावे. तीन विटांवर अथवा दगडावर मडके पालथे/उपडे करुन ठेवावे. बाजुने पेंढा व लाकुड पेटवावेत. चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाकावेत. मडक्याला सर्व बाजुने निट उष्मा मिळाल्यास साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये आतील सामर्गी निट शिजते.