सरकारी खुर्च्या रिकाम्या, अधिकारी मात्र मौजेत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयं आज ‌‘जनतेसाठी’ नव्हे तर ‌‘अधिकाऱ्यांच्या सुखसोयीसाठी’ उघडी ठेवली जातात, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण, सध्या कार्यालयं रिकामी, अधिकारी गायब आणि जनतेच्या समस्या मात्र धूळ खात आहेत, अशी परिस्थिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा घेत अधिकारीवर्गाने प्रशासकीय कारभाराचे तीनतेरा वाजवल्याचे बोलले जात आहे.

पंचायत समिती, नगरपालिका, महसूल, आरोग्य व इतर शासकीय कार्यालयांमध्ये सारखीच परिस्थिती आहे. जबाबदार अधिकारी दिवसभर दिसत नाहीत. आले तर फक्त सही करून पळ काढतात. आजही अनेक ग्रामस्थ आपल्या तक्रारी घेऊन उरण पंचायत समितीत पोहोचले, पण तेथील दृश्य पाहून तेच हादरले. संपूर्ण कार्यालयात जबाबदार अधिकारी गायब असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता नेहमीचा राग आणणारा बहाणा ‌‘साहेब रजेवर आहेत.’ लोकांना न्याय हवा असताना साहेब मात्र ‌‘रजेचा’ आनंद घेत आहेत! सुट्ट्यांचा बहाणा करून काही अधिकारी थेट ‌‘कुटुंब सहलींना’ रवाना झाल्याचे आतल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे चौकशीचे आदेश दिले तरी त्यावर धूळ साचली आहे. वरून अधिकारी ‌‘चौकशी सुरू आहे’ असं सांगून जनतेला फसवतात. उरणकर मात्र आज पेटले आहेत. गावोगावी संतापाची लाट उसळली आहे. ‌‘असे गैरहजर, गैरजबाबदार आणि भ्रष्ट अधिकारी तात्काळ निलंबित करा,’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा उरणमध्ये जनतेचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Exit mobile version