वहिवाटीचा मार्ग मोकळा न झाल्यास शासन दरबारी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

। पाली/बेणसे ।
रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढतोय, अशातच येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. नवनवीन प्रकल्प, इमारती उभारताना गोरगरीब कष्टकरी शेतकर्‍यांच्या पोटावर लाथ बसली जाते. शेतकरी पुरता उध्वस्त होतो. असाच प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथील मागासवर्गीय समाजाचे असणारे शेतकरी सुभाष गायकवाड यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी पूर्वापार असणारा रस्ताच न राहिल्याने त्यांना आपल्या शेतात नांगर, ट्रॅक्टर अथवा इतर शेतीची अवजारे नेता येत नसल्याने त्यांना आपल्या शेतजमिनीत कोणतेही पीक घेता आले नाही. त्यामुळे त्यांची शेतजमीन गेली 10 वर्षांपासून ओसाड बनली असून शासन दरबारी देखील या शेतकर्‍याला न्याय न मिळाल्याने या शेतकर्‍यावर अक्षरशः आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. वहिवाटीचा मार्ग मोकळा न झाल्यास सुभाष गायकवाड व शेतकरी कुटुंबाने शासन दरबारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे इशारा पीडित शेतकरी सुभाष गायकवाड यांनी न्यायासाठी प्रशासन स्थरावर सर्वत्र पत्रव्यवहार केला आहे.
सदर परिस्थितीची माहिती ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी ते तहसीलदार यांना दिली असताना देखील या शेतकर्‍याला अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे एकेकाळी भरघोस पिकाचे उत्पन्न देणारी सोन्यासारखी जमीन आज कवडीमोल भावाची बनली आहे.

सदर शेतकरी यांनी आमच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पेण तहसीलदार यांच्या माध्यमातून लवकरच बैठक लावू, शेतकर्‍यांची बाजू समजून घेऊन त्यांना जलद न्याय देण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक भूमिकेत काम करेल, कोणत्याही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही. – इनामदार, प्रांताधिकारी पेण

Exit mobile version