नागरिकांनी कार्यालयाकडे फिरवली पाठ; निवासी नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन
| रसायनी | प्रतिनिधी |
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय कर्मचारी यांनी आंदोलन धरणे केले होते, त्यामुळे गुरुवारी (दि.12) रोजी सर्वसामान्य जनतेच्या कामाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसत होते. नागरिक यांनीही कार्यालयाकडे पाठ फिरवली होती.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक, कामगार संयुक्त कृती समिती यात सामील होती. निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदन देण्यात आले. देशातील विविध कामगार-कर्मचारी संघटनांच्या निर्णया नुसार देशातील पाच कोटी कामगार-कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी एक दिवसीय देशव्यापी संप, आंदोलन पुकारले आहे.
आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी शिक्षक तसेच संघटित व असंघटित कामगार सुध्दा सामील झाले आहेत.चार कामगार संहिता रद्द करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, आठव्या वेतन आयोग तात्काळ लागु करा, रिक्त पदे भरा, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा योजना लागू करा, महागाई कमी करा, खासगीकरण कंत्राटीकरण रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुर्नविचार करा, शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करा, केंद्र सरकारने मनरेगा कायद्यात केलेला बदलाला विरोध, माथाडी कामगार व असंघटित कामगारांकरीता स्वतंत्र कायदा तयार करावा, अशा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
बेरोजगारी कमी करण्याकरीता उपाययोजना करावी, सर्वच विभागात कर्मचारी संख्या कमी असूनही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अत्यंत मंदगतीने सुरु आहे. एक कर्मचारी दोन चार कर्मचाऱ्यांचे काम करीत आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ विमा योजना लागू करणे बाबत
अद्याप निर्णय झालेला नाही, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, कंत्राटी करण व खासगीकरण धोरण रद्द करून कायम स्वरुपी रोजगार द्यावा. एकूण 18 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खालापूर तहसील कार्यालयाच्या मार्फत देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अमोल वाघ, अशोक सुसलादे, गणेश मुंढे, समाधान पाटील, कसबे, कविता साळवी, विद्या हिरवे, केंद्रे, अविनाश गुर्ले, दीपाली पवार यांच्यासह कार्यालयातील सर्वच कर्मचारी उपस्थित होते. काम बंद आंदोलन नसले तरी आपली नियमित कामे, समस्या घेऊन येणारे नागरिकांनी मात्र कार्यालयाकडे पाठ फिरवली होती, असेच चित्र होते, कार्यालयाच्या आवारात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच लोक दिसत होते.
जनतेच्या कामाचा बट्ट्याबोळ
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक,कामगार संयुक्त कृती समिती यात सामील होती. या आंदोलनांमुळे सर्वसामान्य जनतेच्या कामाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसत होते.
