सरकारी सुट्टी अन् माती वाहतूक जोरात

। रोहा । प्रतिनिधी ।
चणेरा विभागात मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्या असून, या वीटभट्ट्यांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे चाळीस ते पन्नास लाख विटांचे उत्पादन घेतले जाते. या व्यावसायिकांकडून वीटनिर्मिती करण्यासाठी किती रॉयल्टी महसूल विभागात भरली जाते, हा संशोधनाचा विषय आहे. कारण, सरकारी सुट्टी असली की चणेरा विभागात माती वाहतूक जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वीटभट्टी उद्योगात माती, पाणी व इंधनासाठी लाकूड या गोष्टींचा प्रामुख्याने वापर होतो. वीटभट्टी व्यावसायिक यासाठी शासनाकडे नाममात्र रॉयल्टी भरून महसूल तसेच वनविभागाचे अधिकारी यांच्याशी संगनमत करून बिनदिक्कत आपला व्यवसाय करत आहेत. मातीने भरलेले पाच ते सहा ब्रासचे ट्रक दिवसभर चणेरा बाजारातून तसेच खांबेरे रस्ता, बिरवाडी खैरेखुर्द रस्ता या मार्गाने जात असल्याने रस्त्याची दुर्दशा होत असून, स्थानिकांना वाहन चालविणे तसेच पायी चालताना धोका पत्करावा लागत आहे.
गाडीच्या टोकापर्यंत भरलेली मातीची ढेकळे वाहतूक होत असताना नागरिकांच्या अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय नियमानुसार तलाठी, मंडळ अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. पण, या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने अवैध धंदे करणार्‍या मंडळींना रान मोकळे झाले आहे. रोहा तहसीलदार अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version