महसूल खात्याचाच छुपा आशिर्वाद?
। रोहा । जितेंद्र जोशी ।
महाविकास आघाडीच्या राज्यात मोठमोठ्या वसुलीचे आकडे समोर येतच आहेत. पण रोहा तालुक्यातील चणेरा मंडळ विभागात आता शेतकर्याच्या कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय वीटभट्टी व्यावसायिकाने आपल्या शेतीमधील माती जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काढून नेल्याची तक्रार एक शेतकरी महिलेने केल्याने चणेरा विभागात एकच खळबळ उडाली आहे. या विभागातील वीटभट्टी व्यावसायिकांना महसूल खात्याचाच छुपा आशिर्वाद असल्याची चर्चा चणेरा विभागात रंगली आहे.
तक्रारदार महिलेच्या पतीची तळवडे येथे गट क्रमांक 162 ही सामाईक शेतजमीन आहे. सदर महिला काही कामानिमित्त मुंबईत गेली असता 16 व 17 मे या दिवशी तिच्या शेतात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने माती उत्खनन करून सदर माती राजरोसपणे विनापरवाना नेण्यात आली. याबाबत खैरेखुर्द येथील वीट भट्टी व्यावसायिक मुजमिल अहमद गीते याच्याकडे माझ्या शेतातील सुपिक माती परवानगीशिवाय का काढली अशी विचारणा केली असता गीते याने मला हवे तिथून माझ्या वीटभट्टीसाठी माती घेऊन जाईन असे तक्रारदार महिलेला सांगत धुडकावून लावले आहे. यामुळे तक्रारदार महिला शेतकर्यांपुढे यावर्षी भात शेती कशी करावी असा प्रश्न उभा राहिला आहे.
चणेरा विभागात सुमारे 15 ते 16 वीट भट्टी व्यावसायिक असून या भट्ट्यांच्या माध्यमातून प्रती व्यावसायिक सात ते आठ लाख वीट दरवर्षी तयार करत असतात. पण हे वीटभट्टी चालक महसूल प्रशासनाला मागील अनेक वर्षे केवळ 100 ते 200 ब्रास मातीची रॉयल्टी भरत आहेत. याशिवाय या भट्ट्या पेटविण्यासाठी हजारो टन लाकूड देखील बिनदिक्कत जाळत असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. वीट तयार करण्यासाठी नदी, तलाव यातील पाण्याचा वापर होत असल्याने गुराढोरांची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत आहे. वीट भट्टीसाठी लागणारी माती वाहतूक करण्यासाठी सुमारे 10 टन क्षमतेची वाहने गावांतील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक होत असल्याने गावागावात जाणार्या रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.
पण जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःचा खिसा भरण्यात मग्न असणारी प्रशासन व्यवस्था याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असून उलट याबाबत तक्रार करणार्या तक्रारदार व्यक्तींनाच सबुरीने घेण्याचा सल्ला देत आहेत. वीट भट्टी चालकांनी त्यांचा व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून करावा पण गोरगरीब जनतेला त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तक्रारदार महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन महसूल खाते व पोलीस खाते या प्रकरणात आरोपींना अटक करून या प्रकरणात आरोपींनी वापरलेली जेसीबी मशीन, माती वाहतूक करण्यासाठी वापरलेले ट्रक जप्त करण्याची कारवाई करणार का चौकशीचे भिजत घोंगडे ठेवत सदर प्रकरण दाबणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.