| पोलादपूर | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन येत्या 23 व 26 मे तसेच 30 आणि 31 मे रोजी तालुक्यात करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांनी दिली.
विविध प्रकारचे दाखले वाटप, पुरवठा विभागातील योजना, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देणे, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांची पोर्टलवर तपासणी करून मार्गदर्शन करणे, विवाह नोंदणी दाखला, जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, मग्रारोहयो जॉब कार्ड वाटप, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, महाडीबीटी विविध यांत्रिकीकरण योजनांचे अर्ज, नाचणी बियाणे वाटप, स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, नवमतदार नोंदणी फळबाग लागवड योजना, शेतीविषयक अवजारे आदी योजनांची माहिती तसेच विविध विभागांच्या योजनांची माहिती या उपक्रमाद्वारे देण्यात येणार आहे.
पोलादपूर मंडळ अंतर्गत लोहारे ग्रामपंचायतअंतर्गत 23 मे रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, पोलादपूर तहसिल कार्यालयात दि.31 मे रोजी महसूल नायब तहसिलदार यांच्या पर्यवेक्षणाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोंढवी मंडळ अंतर्गत देवपूर हनुमान मंदिर येथे दि. 30 मे रोजी निवासी नायब तहसिलदार यांच्या पर्यवेक्षणाखाली आणि दि. 26 मे रोजी वाकण मंडळ अंतर्गत कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहायक गटविकास अधिकारी पोलादपूर यांच्य पर्यवेक्षणाखाली हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत या उपक्रमाचे आयोजन होणार असल्याने अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी या काळात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही समीर देसाई यांनी केले आहे.