सरकारी कार्यालयात शुकशुकाट; सामान्यांची कामे रखडली

| पाली । वार्ताहर ।

तालुक्यातील अधिकारी व कर्मचार्‍यारी दिवाळी सुट्टीवर गेलेले अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी शुक्रवारी देखील कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकार्‍यांची दिवाळीची सुट्टी आठवडाभर होती की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. दिवाळीचे मुख्य पाच दिवस संपले तरी कर्मचारी आणि अधिकारी अद्याप कार्यालयात रुजू झालेले नाहीत. गुरुवार, शुक्रवारी देखील अनेक शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. खुर्च्यावर कोणीही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते, मात्र टेबलावर फायलींचा ढीग पडलेला होता.

यावर्षी नरक चतुर्दशीला सुट्टी होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशीही भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आल्याने सलग तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी शासकीय कार्यालयात कर्मचारी व अधिकार्‍यांनी हजर राहणे क्रमप्राप्त होते. परंतु शुक्रवार उजाडला तरी अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांचा कार्यालयात पत्ताच नव्हता. शुक्रवारची देखील सुट्टी घेऊन पुन्हा शनिवार, रविवार सुट्टी आहेच हे लक्षात घेऊन सोमवारी कामावर हजरे व्हायचे, असा अनेकांचा मनोदय असावा, यामुळे आठवडाभर शासकीय कामकाज ठप्प आहे.

अनेक कार्यालये ओस पडली असून काही ठराविक स्थानिक कर्मचारी तसेच कनिष्ठ कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे वर्दळ असलेली पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयासह अनेक कार्यालये अधिकारी, कर्मचार्‍यांविना ओस पडली होती.

Exit mobile version