रायगडची पाटी कोरीच

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आज पार पडलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये रायगडमधील एकाही आमदाराचा समावेश नसल्याने रायगडची पाटी कोरीच राहीली आहे. भाजपा शिवसेना युती सरकारच्यावेळी देखील रायगड जिल्ह्याच्या वाटयाला मंत्रीपद आले नव्हते. याचीच पुनरावृत्ती झाल्याचे या ङ्गइडीफ सरकारमध्ये पहायला मिळाले आहे.

शिवसेनेसोबत बंडखोरी करुन सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातील तीन बंडखोर तर भाजपाचे दोन तसेच पाठिंबा दिलेले एक अपक्ष असे एकूण सहा आमदार आहेत. तसेच पोलादपूरचे सुपूत्र असलेले विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर हे देखील रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे यापैकी दोघा तिघा आमदारांना मंत्रीपद मिळेल असे दावे प्रतिदावे बंडखोरी झाल्याच्या दिवसापासून केले जात होते. एकनाथ शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सर्वप्रथम बंडाचे निशाण फडकावणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळेल असे ठामपणे सांगितले जात होते. तर भाजपा समर्थकांकडून प्रविण दरेकर आणि प्रशांत ठाकूर यांच्या नावावर दावा केला जात होता. मात्र या सहापैकी एकाही आमदाराची वर्णी मंत्रीमंडळात लागली नसल्याने सर्वच समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत भाजपा युतीच्या काळात रायगडला कमी प्रतिनिधीत्व मिळाले असल्याचे दिसून येते. त्याचवेळी आघाडी किंवा महाविकास आघाडी सरकार यांच्या कार्यकाळात रायगडला प्रत्येक वेळी मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे. स्व. बॅ अ. र. अंतुले यांनी अनेक मंत्रीपदं तसेच मुख्यमंत्रीपद देखील भुषविले होते. तसेच अ‍ॅड दत्ताजीराव तटकरे, प्रभाकर धारकर, बी. एल. पाटील, स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रायगड जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदे मिळाली होती. याकाळात स्व. मोहन पाटील, मीनाक्षी पाटील आणि सुनील तटकरे यांच्या रुपाने मंत्रीपदे मिळाली होती. त्यानंतर देखील रायगडला सातत्याने आघाडी सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळाले आहे. रविंद्र पाटील, सुनील तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद देखील सातत्याने सोपविण्यात आले होते. तर युती सरकारच्या काळात स्व. प्रभाकर मोरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले होते. तसेच रायगडचे पालकमंत्री देखील त्यांना करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील रायगडच्या अदिती तटकरे यांना एक दोन नव्हे तर नऊ खात्यांचे राज्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद देखील वाटयाला आले होते. याच पालकमंत्री पदावरुन बरेच रामायण देखील घडले.

मात्र शिवसेना आणि भाजपा युती सरकारनंतर आताच्या बंडखोर आणि भाजपा सरकारमध्ये पुन्हा एकदा रायगडकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्ह्यात नाराजीचे वातावरण आहे.

Exit mobile version