शासन आदेश बासनात! शाहू महाराजांच्या जयंतीला सीईओंसह वरिष्ठ अधिकारी गैरहजर

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाने 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाच रायगड जिल्हा परिषदेत मात्र शासन आदेशालाच हरताळ फासल्याचे चित्र समोर आले. विशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी स्वतः परिपत्रक काढूनही त्याच कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विषय समित्यांचे सभापती, प्रकल्प संचालक तसेच शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन, लेखा, पाणी व स्वच्छता विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी सीईओंसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याचे दिसून आले. स्वतःच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करून त्याची अंमलबजावणीच न होणे, हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा नव्हे तर, शासनाच्या आदेशाबाबतच्या उदासीनतेचाही विषय असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. अखेर काही कर्मचाऱ्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून औपचारिकता पूर्ण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचले. त्यांच्या जयंतीदिनीच शासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी या प्रकाराबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही होत आहे. दरम्यान, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या तयारीसाठी मी आदल्या रात्रीपासून रायगडावर होतो. त्यामुळे शाहू महाराज जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्याने कार्यक्रमाला उपस्थित न राहणे अत्यंत खेदजनक आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार अशा कार्यक्रमाला प्रशासनाची उपस्थिती अपेक्षित होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे मी निश्चितच विचारणा करणार आहे.

मंगेश वाकडीकर,
अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version