शासकीय विश्रामगृहाला टाळे

चार वर्षे दुरुस्ती न केल्याने दुरवस्था

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे मंत्रालयातील अनेक मान्यवर तसेच शासकीय अधिकार्‍यांची ये-जा करीत असतात. परंतु, शासकीय विश्रामगृह नसल्याने अधिकारीवर्गाला खासगी लॉजिंगमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. कोव्हीड 19 पासून मुरुडच्या शासकीय विश्रामगृहाचा ताबा ग्रामीण रुग्णालयाने घेतला होता. कोरोनाग्रस्तांवर इलाज करण्यासाठी सदरचे विश्रामगृह वापरात आणले जात होते. परंतु, मागील चार वर्षांपेक्षा जास्त काळ हे विश्रामगृह बंद ठेवण्यात आले असून, याचा वापरच बंद करण्यात आला आहे.

मुरुडला भेटी देणारे आमदार, खासदारांना खासगी इमारतीमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत आहेत. मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याकडून विश्रामगृहाच्या दुरुस्ती व देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे. समुद्रकिनारी असणारे शासकीय विश्रामगृह सर्वांना आवडीचे व राहण्याची उत्तम व्यवस्था असणारे ठिकाण असूनदेखील या विश्रामगृहाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मागील चार वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असून, हे सुरु तरी केव्हा होणार याची विचारणा अधिकारी व पर्यटक करीत आहेत. ऐन निवडणुकीत जिल्ह्याबाहेरील अधिकारी निवडणुकीचे काम करण्यासाठी येत असतात; परंतु विश्रामगृह नसल्याने त्यांना सध्या खासगी लॉजिंगचा आसरा घ्यावा लागत आहे. याबाबत मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता रमेश गोरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अलिबाग येथील श्रीनाथ कन्स्ट्रक्शन यांना काम देण्यात आले आहे. त्यांनी हे काम अद्याप सुरु न केल्याने त्यांना लेखी पत्र पाठवण्यात येणार असून, लवकरात लवकर हे काम सुरु करण्याचे सांगण्यात आले आहे. सदरील विश्रामगृहाचे दुरुस्ती व पेंटिंग तसेच इलेक्ट्रिकचे कामसुद्धा करण्यात येणार आहे.

Exit mobile version