। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड शहराचा परिसर निसर्गरम्य असल्याने जगातून पर्यटक मुरुडला भेट देतात. येथील शासकीय कार्यालये समुद्रकिनारीच आहेत. त्यातील 3 शासनाची विश्रामगृह आहेत. कोव्हीड काळात विश्रामगृह आरोग्य विभागाला वर्ग केल्याने 3 वर्षात त्याची कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याने विश्राम गृहाची वाईट परीस्थिती झाली होती. नुकतेच आरोग्यविभागाने त्यांचे साहित्य नेल्याने हे विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाले आहे. या विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने 80 लाखाच्या निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाला पाठवली असल्याची माहिती अभियंता शारदा बोराडे यांनी दिली. त्यातील 55 लाख मंजूर होऊन कामाला सुरवात झाली आहे. विश्रामगृहाचे खालचे फ्लोरिंग, दरवाजे आणि रंगकाम झाले असून, येत्या 2 महिन्यात उर्वरित काम पूर्ण होईल, अशी माहिती देखील बोराडे यांच्याकडून देण्यात आली आहे.