मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
भर उन्हात कोंडी सोडविण्याचे पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न
। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरुन मुंबई, ठाणे तसेच पुणे येथून उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक कोकणात निघाले आहेत. परंतु, खांब कोलाडपासून इंदापूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेली नऊ दिवसापासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे ‘रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था दिसून येत असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भर उन्हात उभे राहून रायगड पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
उन्हाळी सुट्ट्या शुक्रवार दि.1 मेपासून सुरु झाल्या असल्यामुळे गर्मीने हैराण झालेले नागरिक शरीराला गारवा मिळण्यासाठी, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील समुद्रावर जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पर्यटक तसेच कोकणवासी मुंबई-गोवा हायवेवरुन एसटी बस, फोर व्हिलर, रिक्षा, टू व्हीलर तसेच इतर वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु, मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु आहे. परंतु हे काम काही केल्या पूर्ण होईना. लोकनेत्याकडून फक्त ‘तारीख पे तारीख, दिल्या जात आहेत. आता नवीन डेडलाईन मे अखेर दिली आहे. परंतु, हे काम पूर्ण होईल असे कामाच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. जणू डेडलाईनची पद्धत ‘लांडगा आला रे आला’, अशी झाली आहे. कारण लोकांना गणपती, होळी व उन्हाळी सुट्टीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासीवर्ग हैराण झाले आहेत. ‘यापासून केव्हा सुटका होणार?’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.






