मंडप डेकोरेटर्स, केटरिंग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान
| पाताळगंगा-खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यासह परिसरात अचानक झालेल्या तुरळक अवकाळी पावसाने सुरू असलेल्या लग्नसराईवर मोठे संकट ओढवले आहे. विवाह सोहळ्यांत पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले मंडप वाऱ्यामुळे हेलकावे खात असल्याचे पहावयास मिळाले. सजावटीचे साहित्य, ध्वनी व्यवस्था, खानपान साहित्य तसेच विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आयोजकांसह वऱ्हाडी मंडळींची मोठी तारांबळ उडाली होती.
खालापूर तालुक्यात गुरूवारी (दि.7) अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पडलेल्या 15 मिनिट मुसळधार पावसाने अनेकांची तारांबळ उडवली होती. त्यामुळे मे महिन्यात सुरू असलेल्या लग्नसराईत अवकाळी पावसाने मोठे विघ्न आणले असून, अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यांचे नियोजित बेत कोलमडले आहेत. अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वधू-वरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तर, वऱ्हाडी मंडळींची मोठी तारांबळ उडत आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने जेवणाची व्यवस्था, पूजा विधी आणि वऱ्हाडींच्या बसण्याची व्यवस्था यांचे गणित विसकाळीत झाले. शिवाय मंडप डेकोरेटर्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वधु-वरांसह यजमानांचा चांगलाच हिरमोड होत आहे.
लाखो रुपयांचे नुकसान
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप उडून गेले आहेत. तर, पावसामुळे सजावटीचे साहित्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, अचानक पडणाऱ्या पावसामुळे जेवणाची व्यवस्था, पूजा विधी आणि वऱ्हाडींच्या बसण्याची व्यवस्था कोलमडत आहे. मंडप डेकोरेटर्स यांच्यासह केटरिंग व्यावसायिकांचे देखील मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी त्यांना बुकिंग रद्द करावी लागत आहेत. ग्रामीण भागात घरासमोर मांडव टाकून होणाऱ्या लग्नांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, अनेकजण आता सुरक्षिततेसाठी हॉलकडे वळत आहेत.






