75 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता 15 जूनपर्यंत ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील सुमारे 75 हजार पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
राज्य शासनामार्फत लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम राबविला जात आहे. शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे, हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे.
थेट जनतेशी संवाद
जत्रेच्या माध्यमातून अधिकार्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. विविध योजनांसाठी पात्र असणार्या आणि लाभ घेणार्या लाभार्थींना लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्रशासन, शासन, जनता एकाच छताखाली
प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत, हे हेरुन शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रुपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी. योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे, याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.