कर्जतमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासकीय ट्रॅकर

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई आणखी तीव्र होत चालली आहे. त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दुसरा शासकीय ट्रॅकर 26 एप्रिल पासून कार्यान्वित झाला आहे. तालुक्यात 13 एप्रिलपासून शासकीय ट्रॅकरमधून पिण्याचे पाणी पुरवले जात असून सध्या तीन गावे आणि आठ आदिवासी वाड्यांना शासकीय ट्रॅकर ने पाणीपुरवठा सुरु आहे.

तालुक्यात डोंगरावर असलेल्या आदिवासीं वाड्यांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते.तालुक्यातील चार प्रमुख नद्यांपैकी उल्हास नदी आंबिवली पासून पुढे बारमाही वाहते. पेज नदी वगळता पोश्री आणि चील्हार या दोन नद्या उन्हाळयात कोरड्या असतात.त्यामुळे पोश्री आणि चिल्हार नदीच्या लगतच्या गावांमध्ये पाण्याची समस्या उन्हाळ्यात अधिक तीव्र असते.या नद्यांच्या आजूबाजूची गावे या ठिकाणी पाणीटंचाई अधिक भासत असते. उन्हाळ्यात तीव्र होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर ट्रँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असते. तालुक्यातील 18 गावे आणि 60 आदिवासी वाड्यांचा समावेश टंचाईग्रस्त गावे वाड्या म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी तालुक्यातील 16 गावे आणि 56 आदिवासी वाड्या या पाणीटंचाई ग्रस्त होत्या.
त्यानुसार दुसरा शासकीय ट्रँकर 26 एप्रिलपासून कार्यान्वित झाला आहे. दहा हजार लिटर क्षमतेच्या दुसर्‍या टँकरच्या माध्यमातून मोग्रज ग्रामपंचायतमधील जांभूळवाडी, पाथरज ग्रामपंचायतमधील धोत्रेवाडी, बोरीचीवाडी, हिरेवाडी येथे टँकर सुरु करण्यात आला आहे. ओलमन ग्रामपंचायत मधील बोन्डेशेत आणि मोग्रज ग्रामपंचायतमधील मोग्रज गावामधील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासकीय टँकर पोहचला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील तीन गावे आणि आठ आदिवासी वाड्यांमध्ये शासकीय टँकरने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पोहचवले जात आहे.

Exit mobile version