चवदार तळे राष्ट्रीय स्मारकाकडे शासनाचे दुर्लक्ष

प्रतिवर्षी केला जातोय लाखो रुपयांचा खर्च

| महाड | वार्ताहर |

महाड शहरातील चवदार तळे हे शासनाच्या उदासीनतेमुळे कायम उपेक्षित राहात आहे. गेली पंधरा वर्षांहून अधिक काळात या राष्ट्रीय स्मारकाच्या विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची टाकला जात आहे. मात्र, हा निधी ठोस उपाय योजनांवर खर्च केला जात नसल्याने आजही हे तळे विकासापासून वंचित राहिले आहे. याबाबत भीमसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत.

20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शोषित पीडितांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला. या क्रांतीमुळे चवदार तळ्याचे पाणी तमाम दलित शोषित प्रीतांसाठी खुले करण्यात आले. या क्रांतीची दखल जागतिक पटलावर नोंद झाली. यामुळे संपूर्ण देशभरातून दि. 19 आणि 20 मार्च रोजी महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनासाठी लाखो भीमसैनिक महाडमध्ये येतात. या चवदार तळ्याला स्पर्श करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. शासनाने या ऐतिहासिक चवदार तळ्याची नोंद राष्ट्रीय स्मारक म्हणून केली आहे. मात्र, या राष्ट्रीय स्मारकाची देखभाल दुरुस्ती होत नाही. प्रतिवर्षी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, ठोस नियोजन अभावी चवदार तळे विकासपासून आजही वंचित आहे.

चवदार तळ्याचे देखभाल दुरुस्तीचे काम महाड नगरपालिकेच्या ताब्यात आहे. मात्र, ज्या पद्धतीने चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण अबाधित राहणे आवश्यक आहे. त्या पद्धतीमध्ये ते ठेवले जात नाही. चवदार तळ्याच्या ठिकाणी 19, 20 मार्च, 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिन आणि सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भीमसैनिक चवदार तळ्यावर दाखल होत असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक, शैक्षणिक सहली, चवदार तळे पाहण्यासाठी येत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने महानगरपालिका केवळ तात्पुरत्या रंगरंगोटीचे काम करते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना भीमसैनिकांना राहण्याची किंवा स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधादेखील नाही. चवदार तळ्याच्या ज्या पायऱ्यांवरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली उतरले आणि पाण्याला स्पर्श केला त्या पायऱ्यांचीदेखील दुरवस्था झालेली आहे. चवदार तळ्याच्या चहुबाजूला वाहनांचे अनधिकृत पार्किंग केलेले आहे. अनधिकृत वाहन पार्किंग आणि अनधिकृत अतिक्रमण याबाबत पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नसल्याने चवदार तळ्याच्या चहुबाजूने फिरणे अशक्य होते. शेजारी असलेल्या बगीच्यांची देखील दुरावस्था झालेली आहे.

चवदारतळ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी विविध माध्यमातून लाखो रुपये खर्च केले जातात. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आजपर्यंत विविध पर्याय उभे करून लाखो रुपये खर्च केले आहेत, असे असतानादेखील आता आरओ प्लांट उभा करून पाणी स्वच्छ केले जात आहे. सध्या वापरत असलेली पद्धतदेखील पाणी पूर्ण स्वच्छता किंवा पिण्यायोग्य होत नसल्याची तक्रार केली जात आहे. याबाबत भीमसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेजारी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची देखील अशीच अवस्था झालेली आहे. सभागृहामध्ये आवाज घुमत असल्याने तांत्रिक बदल करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च केले. मात्र, आजही परिस्थिती जैसे थेच आहे.

Exit mobile version