। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शिवसेना खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना उपरोधिक टोला लगावला आहे. 12 आमदारांच्या शिफारसीवर होत असलेल्या विलंबावरून त्यांच्यावर टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना खा. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नव्हे. घटनेत स्पष्ट लिहिले आहे की, राज्य सरकारने राज्यपालांना केलेल्या शिफारसी त्यांनी मान्य करायच्या असतात. आमच्या 12 आमदारांची नियुक्ती करणे त्यांना बंधनकारक आहे. लोकशाहीत इतका अभ्यास बरा नाही. तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायचा असतो.फ असे म्हणत राज्याचे राज्यपालांकडे असलेल्या महत्वाचे प्रलंबित निर्णय त्यांनी त्वरित घ्यावे अशी मागणी केली.
याचबरोबर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजपसाठी निधी मागण्यावरुन टीका केली. ते म्हणाले की, मभारत शेतकर्यांमुळे, कष्टकर्यांमुळे आणि उद्योजकांमुळे बलाढ्य झाला आहे. मात्र आम्हाला आताच नव्याने समजलं की भाजपला देणग्या दिल्याने देश बलाढ्य होतो. यामुळे देशात गोंधळ निर्माण झाला आहे. देणग्या आम्हालाच द्या दुसर्याला देऊ नका असा स्पष्ट संदेश आहे. देशातील लोकांकडून देणग्या घेणं हा बहाणा आहे. हा देशातील उद्योगपतींना स्पष्ट संदेश आहे की देणग्या आम्हालाच द्या. दुसर्याला दिल्या तर आमचं त्यावर लक्ष राहील. भाजपच्या बँक खात्यात शेकडो कोटी जमा झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.