कळंब येथील शासकीय आश्रम शाळा पुन्हा सुरू

आदिवासी समाज संघटनेचा पुढाकार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका बहुल आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात ठाकूर समाज, कातकरी, महादेव कोळी समाजाच्या जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात रहात आहेत. तालुक्यात चार शासकीय आश्रम शाळा असून आदिवासी विद्यार्थी संख्या जास्त असल्याने शाळा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे एकात्मिक आदिवासी विकास पेण प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे व आदिवासी समाज संघटनेच्या पुढाकाराने कळंब येथील काही वर्षापासून बंद पडलेली शासकीय आश्रम शाळा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या कार्यक्षेत्रातील कळंब आश्रमशाळा पटसंख्या अभावी बंद करण्यात आली होती. बंद केलेल्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांच्या पसंतीनुसार व भौतिक सोयी सुविधा असलेल्या जवळच्या आश्रम शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तसेच, या आश्रम शाळेमध्ये शिकत असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अन्य ठिकाणी पाठवण्यात आले होते. आदिवासी जमातीची कातकरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी कळंब शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याबाबत मागणी होत होती. त्यानुसार या ठिकाणी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आश्रम शाळा सुरू करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील आदिवासी समाज संघटना यांच्याकडून वारंवार मागणी केली जात होती. तसेच, प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देखील या ठिकाणी शाळेची आवश्यकता असल्याने कळवण्यात आलेले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत कर्जत तालुक्यातील कळंब या ठिकाणाची बंद करण्यात आलेली इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची प्राथमिक शासकीय आश्रमशाळा सन 2025- 26 शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कळंब येथील शासकीय आश्रम शाळा तात्पुरती स्वरूपात कशेळे येथील भाडेतत्त्वावर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

कर्जत तालुका ग्रामीण भाग असल्याने येथील विद्यार्थी संख्या जास्त आहे. कळंब शाळेसाठी स्थानिक लोक प्रतिनिधी तसेच आदिवासी समाज संघटना यांनी वारंवार प्रकल्प पेण कार्यालयात पत्र व्यवहार करून त्यांची मागणी केली. प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देखील या ठिकाणी शाळेची आवश्यकता असल्याने मान्यता देण्यात आली आहे.

आत्माराम धाबे,
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण

Exit mobile version