न्यायालयाचा आदेश झुगारला; उरण मनपाचा आरोग्य विभाग झोपेत
| उरण | प्रतिनिधी |
मुंबई उच्च न्यायालयाचा थेट आदेश असतानाही उरण नगरपरिषद हद्दीत कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार धडाधड सुरूच आहेत. मनपेकडून बंदीचा फतवा जारी झाल्याचा फक्त कागदी गाजावाजा, पण प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली सुरू आहे. कबुतरांना दाणे टाकून काहीजण स्वतःला धार्मिक ठरवत आहेत, पण शहर मात्र त्यांच्या या ‘कृपेने’ आजारांच्या विळख्यात सापडत आहे, अशी चर्चा आहे.
विशेषतः विमला तलाव परिसरात सकाळच्या वेळी कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांची गर्दी उसळते. दाणे टाकू नका, असे सांगितले तर हेच लोक भांडणासही तयार होतात. यावर नगरपरिषदेचा आरोग्य विभाग कानावर हात ठेवून बसला आहे. ना फलक, ना गस्त, ना कारवाई प्रशासनाची भूमिका अक्षरशः कबुतरासारखी डोळे मिटून बसलेली, अशी स्थिती आहे.
कबुतरांची विष्ठा, पिसे आणि दाण्यांचे उरलेले कण यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि रोगांचे सावट निर्माण झाले आहे. हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, आणि हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया यांसारखे बुरशीजन्य आजार या कबुतरांमुळे पसरतात. लहान मुले, वृद्ध आणि दमा रुग्णांसाठी हे आजार धोकादायक ठरतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. “मानवी आरोग्य सर्वोच्च असून ते कोणत्याही परंपरेपेक्षा महत्त्वाचे आहे,” असा न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला होता. पण, उरणमध्ये न्यायालयाच्या आदेशाची किंमत शून्य! नगरपालिका प्रशासनाची गाडी बंद फाइलांच्या डबक्यात अडकलेली दिसते. जागृत नागरिकांनी अनेकदा फलक लावा, कारवाई करा, गस्त वाढवा अशी मागणी केली, पण आरोग्य विभागाच्या गाडीत अजूनही चाकेच बसलेली नाहीत. नागरिक संतप्त, प्रशासन शांत, आणि कबुतरे मस्त! आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतून हवेत पसरलेले बुरशीजन्य कण नाकाद्वारे शरीरात जातात. त्यामुळे श्वसन विकार, फुफ्फुस संसर्ग आणि दम्याचे झटके वाढतात. पण ही माहिती कागदावरच राहिली, कृती मात्र शून्य.







