ग्रामपंचायत प्रचाराचा धुरळा शांत

1 हजार 700 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
30 गावे राजकीय संवेदनशील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूकांचा जोरदार प्रचार काही दिवसांपासून सुरु होता. त्याला आज सायंकाळी पाच नंतर ब्रेक लागला असून आता वैयक्तीत भेटीगाठींवर भर दिला जात आहे. 49 ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्यानंतर 191 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 531 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर 1 हजार 940 सदस्यपदांसाठी 3 हजार 238 उमेदवार नशिब आजमावत आहेत. दरम्यान, 18 डिसेंबर रोजी होणार्‍या मतदानाच्या पार्श्‍वभुमीवर रायगड पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

रायगड पोलिस अधिक्षक हद्दीत 164 ग्रामपंचायतीसाठी तर पनवेल आणि उरण तालुक्यातील नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील 27 ग्रामपंचायती अशा एकुण 191 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यासाठी रायगड पोलिस अधिक्षक हद्दीत 507 मतदान केंद्र असून त्यापैकी 30 गावे हे राजकीय दृष्टया संवेदनशील ठरविण्यात आली आहेत. निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर सीआरपीसी 107 अंतर्गत 445, 109 अंतर्गत 12, 110 अंतर्गत 22, 149 अंतर्गत 1 हजार 809 तर 93 प्रमाणे 8 अशा 2 हजार 296 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 30 गावात पोलिसांनी रुट मार्च केले आहे. 310 शस्त्र जमा करण्यात आले आहेत. तर गावभेटींचा कार्यक्रम आयोजित करुन 49 ठिकाणी विभागीय पोलिस अधिकारी तर 228 ठिकाणी प्रभारी यांनी ग्रामस्थांची जनजागृती केली आहे. नेमण्यात आलेल्या पोेलिस बंदोबस्तानुसार 127 पोलिस अधिकारी, 806 पोलिस अमंलदार, एसआरपीएफचे 3 प्लाटून अंतर्गत 100 जवान, 500 होमगार्ड, तसेच पेण माणगाव येथे दंगल नियंत्रक पथक अंतर्गत 90 पोलिस अमंलदार, तात्काळ प्रतिसाद पथकाचे 14 पोलिस अमंलदार असे एकुण 1 हजार 700 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Exit mobile version