। अलिबाग । प्रतिनिधी ।
निधन, राजीनामा अथव अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील सदस्यपद रिक्त राहिलेल्या जागांसाठी पोट निवडणूकीचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने 7 एप्रिल रोजी जाहिर केला. रायगड जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीमधील 96 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 25 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुुरु करण्यात आली. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकूण 96 रिक्त जागांमध्ये सरपंच 11 व सदस्य पदासाठी 85 उमेदवार रिंगणात असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मंगळवारपर्यंत (दि.2 मे) नामनिर्देशन अर्ज भरले जाणार आहेत. बुधवारी (दि.3 मे) सकाळी अकरा वाजल्यापासून प्राप्त अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यामध्ये वैध व अवैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच सोमवारी (दि.8) दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. दुपारी तीननंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करून चिन्ह वाटप होणार आहे.
अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठ दिवस उमेदवारांना प्रचाराची संधी दिली जाणार आहे. प्रचाराला मतदानाच्या 24 तास अगोदर बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.18) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे. शुक्रवारी (दि.19) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने तहसीलदार ठरवणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.