ग्रामपंचायत निवडणुका लांबण्याची शक्यता

गावकारभार चालविणाऱ्या पुढाऱ्यांना प्रतीक्षा

| अलिबाग | प्रतिनिधी |

जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपला. आता निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र, लोकसभा निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अलिबागमधील 34, मुरूड चार, पेण 18, पनवेल 15, उरण चार, कर्जत 30, खालापूर तीन, रोहा 26, सुधागड सहा, माणगाव 21, तळा 18, महाड 30, श्रीवर्धन 16 व म्हसळ्यामधील 11 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम 6 ऑक्टोबर ते 16 जानेवारी या कालावधीत पार पडला. त्यामध्ये गावाचे नकाशे अंतिम करणे, सीमा निश्चित करणे, प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रभाग प्रारुप रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविणे, त्याची दुरुस्ती करून मान्यता देणे, प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेणे, अभिप्राय नोंदविणे, अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे, प्रभाग रचना अंतिम करणे, अशी अनेक प्रकारची कामे या कालावधीत झाली. त्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी कामाला लागले होते. ग्रामपंचायत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकांचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गावभेटीदेखील करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, मतदारयादींची कामे करणे, अशी अनेक प्रकारची कामे सुरु झाल्याने ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक बसण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यास ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासक आपल्या मर्जीने चालल्यास गावांचा विकास होण्यास अडथळे येण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा.

श्रीधर भोपी, माजी सदस्य,
अलिबाग पंचायत समिती

लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका घेणे अपेक्षित आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन तातडीने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा.

अनिल पाटील, तालुका चिटणीस,
शेकाप अलिबाग
Exit mobile version