| अलिबाग | प्रतिनिधी |
जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मतदार यादी तयार करण्याचे कामही ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रशासनाकडून पुर्ण झाले आहे. आता प्रतिक्षा ग्रामपंचायत निवडणूकीकडे लागून राहिली आहे. जिल्ह्यातील 260 ग्रामपंचायतीच्या निवडणूका गणेशोत्सवानंतर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात 210 ग्रामपंचायत सार्वत्रिक व 50 ग्रामपंचायत पोटनिवडणूका होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार यादी तयार करण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील तहसील कार्यालयात होते. ग्रामपंचायतीची पारंपारिक पद्धतीने मतदार यादी बनवण्याचे काम तहसील कार्यालयस्तरावर करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल यांच्या मदतीने ही कामे वेगाने करण्यात आली. 10 ऑगस्टला प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रारुप यादी प्रसिध्द केल्यानंतर 21 ऑगस्टपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या. त्यानंतर 25 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली.
अलिबाग, मुरुड, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, व म्हसळा या तालुक्यातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायती व 50 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या राजकिय पक्षासह प्रशासकिय यंत्रणादेखील आता निवडणूकीच्या कार्यक्रमाकडे लक्ष लावून आहेत. निवडणूकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत.